Ad will apear here
Next
वेडात मराठे वीर दौडले सात - नेसरीची लढाई


तो दिवस होता २४ फेब्रुवारी १६७४. राज्याभिषेकापूर्वी काही महिने शिवाजी महाराज पन्हाळगडावर होते. याच काळात आदिलशाहीचा सरदार बहलोलखान हत्ती-घोड्यांसह वीस हजार सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला. याची खबर लागताच प्रतापराव गुजर आणि इतर मान्यवर सरदारांना छत्रपती शिवाजीराजांनी गडावर बोलावले आणि आज्ञा दिली, की ‘खान वळवळ भारी करतो, त्यास मारोन फते करणे.’ 

महाराजांची आज्ञा घेऊन सरसेनापती प्रतापराव गुजर आपल्या सैन्यानिशी बहलोलखानावर चालून गेले. बहलोलखानाचा मुक्काम डोण नदीजवळ उमराणी गावी होता. मराठ्यांनी सर्वप्रथम एका बाजूने पाण्यापासून तोडले आणि दुसऱ्या बाजूस झालेल्या तुंबळ लढाईत खानाला मराठ्यांनी धूळ चारली. पाण्याशिवाय आणि मराठी सैन्याच्या हल्ल्याने कासावीस झालेल्या खानाला शरणागती पत्करल्यावाचून दुसरा पर्याय राहिला नाही. त्यांनी प्रतापरावांकडे आपला वकील पाठवला. वकिलाच्या रदबदलीने आणि गोड शब्दांनी प्रतापरावांचे मन तयार झाले. खानाची चांगली खोड मोडल्यानंतर तो पुन्हा फिरून येणार नाही अशी त्यांना खात्री वाटली. 

सरसेनापती प्रतापराव गुजरांनी खानाला अभय दिले. इतकेच नाही तर त्याला कैद न करता, तेथून निघून जाण्यास वाट करून दिली. खानाने प्रतापराव गुजरांचा विश्वास घात केला होता. या सर्व गोष्टी महाराजांना कळल्यावर महाराज अत्यंत चिडले होते. कारण महाराजांच्या आज्ञेचे पालन करण्यात प्रतापराव गुजर अत्यंत कमी पडले होते. 

बहलोलखान पराभवाचा बदला घेण्यास परतून येईल अशी शंका हुशार महाराजांना आल्याशिवाय राहिली नाही. महाराजांनी प्रतापरावांना खरमरीत पत्र लिहून ‘सला काय निमित्य केला? असा जाब विचारला. ‘तुम्ही शिपाईगिरी केलीत, सेनापतीसारखे वागला नाहीत’ अशी प्रतापरावांची निर्भर्त्सना केली. या महाराजांच्या खरमरीत पत्रामुळे प्रतापराव गुजर मनातून दुखावले गेले. 

महाराजांच्या अंदाजाप्रमाणे बहलोलखान याने परत हल्ले करण्यास सुरुवात केली. शिवराज्याभिषेकाची अत्यंत जोरदार तयारी राजगडावर सुरू होती. त्यातच बहलोलखानाचे हल्ले महाराजांना पचण्यासारखे नव्हते. त्यांनी संतापाने प्रतापरावांना दुसरे पत्र लिहिले, ‘हा बहलोलखान वरचेवर का येतो. त्यास गर्दीस मिळवून फत्ते करणे. अन्यथा आम्हाला तोंड न दाखवणे.’ राज्याभिषेकापूर्वी बहलोलखानाचा फडशा उडविला नाही, तर राज्यारोहणप्रसंगी महाराजांना प्रतापरावांचा मानाचा पहिला मुजरा झडणे अशक्य होते! रायगडावरचे दरवाजे एकट्या प्रतापरावास बंद होते! 

महाराजांचे हे शब्द प्रतापरावांच्या खुप जिव्हारी लागले. महाराजांचे लष्कर प्रतापरावांच्या मदतीला पोहोचलेले नव्हते. प्रतापराव या सुमारास गडहिंग्लज परिसरात होते. खानाचे सैन्य नेसरीच्या दिशेने चाल करून येत आहे ही खबर प्रतापराव गुजरांना लागली. आणि हाताशी असणाऱ्या सहा शिलेदारांसह प्रतापराव खानावर चालून गेले. खानाच्या अफाट सैन्यासमोर या सात वीरांचा निभाव लागणे कठीण होते. प्रतापराव धाडस आणि शौर्याची परिसीमा गाठू लागले होते. 

एवढ्या प्रचंड पठाणी फौजांपुढे आपण अवघे सात जण काय करू शकणार असा साधा विचारसुद्धा त्यांच्या डोक्यात आला नाही. सात जणात विसाजी बल्लाळ, विठोजी शिंदे, विठ्ठल पिळदेव, दिपाजी राऊतराव, सिद्दी हिलाल, कृष्णाजी भास्कर या सर्वांनी खानाला गर्दीला मिळवल्याशिवाय महाराजांना मुजरा नाही असे ठरवले होते. प्रतापराव देहभान विसरले. त्यांनी एकदम बेहोशपणे घोडा पिटाळला. त्यांच्या मागोमाग ते सहा शिलेदार दौडत सुटले! कुठे? बहलोलखानावर! पठाणावर! सहा ते अन् सातवे प्रतापराव! अवघे सात! सातच! सूर्याच्या रथाचे जणू सात घोडे रथापासून निखळले! आणि बेफाम सुटले. 

प्रतापरावांचा तोल सुटला. मराठी रक्त तेलासारखे भडकले. जमीन तडकू लागली. धुळीचे लोट उधळीत उधळीत सात जण नेसरीच्या रोखाने निघाले. प्रतापराव सूडासाठी तहानलेले होते. त्यांच्या मस्तकात संताप आणि सूड घुसळून उठला होता. प्रतापराव सरदारी विसरले. त्यांनी केवळ शिपाईगिरीची तलवार उचलली. त्यांना आता कोण थांबवू शकणार होते? ते आणि ते सहा जण बंदुकीच्या गोळ्यांसारखे सणाणून सुटले होते. 

बहलोलखान अफाट फौजेनिशी नेसरीच्या डोंगरातील खिंड ओलांडीत होता. एवढ्यात धुळीचा पिसारा पसरीत पसरीत हे सात मराठी स्वार खानाच्या फौजेवर चालून आले. कोणत्या शब्दांत वर्णन करायचे त्यांच्या आवेशाचे आणि त्यांच्या अविचाराचे? बहलोलखान चकितच झाला. अवघ्या सहा लोकांनिशी खासा प्रतापराव आपल्यावर चालून येईल अशी सुखद कल्पना त्याला मनोराज्यातही कधी आली नव्हती. 

सरसेनापती प्रतापराव आणि ते सहा खानाच्या तुफान खवळलेल्या सेना समिंदरात एकदम तलवारी घालीत घुसले. जे त्यांच्या तडाख्यात सापडले ते मेलेच. पठाणांच्या एवढ्या प्रचंड फौजेत अवघे सात विजेचे लोळ अनिर्बंध धुमाकूळ घालू लागले. सातांनी शर्थ केली. पठाणांचे घाव सातांवर कोसळत होते. नेसरीची खिंड रक्ताने शिंपून निघाली. शत्रूचा गराडा सातांभोवती भोवऱ्यासारखा पडला. वादळात घुसलेल्या नौका खालीवर होऊ लागल्या. इतक्यांविरुद्ध अवघे सात! किती वेळ टिकतील? एक एक इरेचा मोहरा धरणीवर कोसळू लागला. शर्थीची समशेर करून अखेर प्रतापरावही ठार झाले! दख्खनच्या दौलतीतले सात तारे तुटले! महाराजांचा दुसरा तानाजी पडला! खानाच्या सेनासमिंदराची प्रचंड लाट महाराष्ट्रातून वाहत गेली. 

महाराजांचे शब्द प्रतापरावांच्या इतक्या खोलवर वर्मी रुतले होते. ‘खानाला तरी मारीन, नाही तर मी तरी मरेन’ असे त्यांनी ठरवले होते. धाडस आणि शौर्याचे परिसीमा गाठणारे हे वीर धारातीर्थी पडले. 

महाराजांना ही वार्ता कळल्यावर ते अतिशय दुःखी झाले. राज्याच्या सरसेनापतीला दूरदृष्टी हवी ही अपेक्षा महाराजांनी करणे स्वाभाविक होते. परंतु भावनेच्या भरात सरसेनापती प्रतापरावांसारख्या निधड्या छातीचा वीर दुसरी चूक करून बसला. २४ फेब्रुवारी १६७४ रोजी प्रतापरावांसह सहा वीरांना वीरगती मिळाली. दौलतीचे फार मोठे नुकसान झाले. महाराजांचा दौलतबंकी हरपला. 

प्रतापरावांच्या मृत्यूने मनाला लागलेली टोचणी शिवरायांनी प्रतापरावांच्या कन्येशी आपले धाकटे पुत्र राजारामांचा विवाह करून काहीशी कमी केली. नंतरच्या काळात छत्रपती शंभूराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाच्या कैदेतून शंभुपुत्र शाहूंना मुसलमान करण्याचा घाट औरंगजेबाने घातला असताना त्यांच्याऐवजी प्रतापरावांचे दोन पुत्र खंडेराव व जगजीवन राव यांनी पुढे होऊन मुस्लिम धर्म स्वीकारला व शाहूराजांना बाटवण्यापासून वाचवले. 

नेसरी येथे प्रतापरावांचे समाधिस्थान अत्यंत चांगल्या रीतीने जिर्णोद्धारित करून त्यांचा पुतळा गावातील मुख्य चौकात उभा करण्यात आला आहे. भोसरे या त्यांच्या जुन्या वाड्यातही त्यांचे छोटेखानी स्मारक उभारण्यात आले आहे. अशा या सात वीरांना कोटी कोटी प्रणाम.

- डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर
(इतिहास अभ्यासक, पुणे)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EUMKCV
Similar Posts
स्त्री-शिक्षणासाठी झटलेल्या श्रीमंत इंदुमती राणीसाहेब राजर्षी शाहू महाराजांच्या स्नुषा श्रीमंत इंदुमती राणीसाहेबांनी स्त्री-शिक्षणविषयक, तसेच अन्य सामाजिक कार्यातून राजर्षी शाहू महाराजांचा वारसा समर्थपणे पुढे चालवला. ३० नोव्हेंबर हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
छत्रपती शिवरायांच्या पत्नी सकवारबाई राणीसाहेब छत्रपती शिवाजी महाराज व सकवारबाई राणीसाहेब यांचा विवाह नऊ जानेवारी इ. स. १६५६ रोजी राजगडावर जिजाऊसाहेबांनी मोठ्या थाटामाटात लावून दिला.
शाहिस्तेखानाला शिक्षा - (राजमाता जिजाऊसाहेब - २१) डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर यांनी लिहिलेल्या ‘राजमाता जिजाऊसाहेब’ या लेखमालेचा २१वा भाग...
जिजाऊंचा जन्म व बालपण (राजमाता जिजाऊसाहेब - ३) डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर यांनी लिहिलेल्या ‘राजमाता जिजाऊसाहेब’ या लेखमालेचा तिसरा भाग...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language